माझ्यापासून दूर कूस बदलणारी रात्र...
पहाटेच्या प्रकाशात थोडा प्राजक्त वेचून घेईन म्हणतो...
उद्या एक दिवस थोडा आराम करून घेईन म्हणतो...
पुन्हा तेच शब्द, पुन्हा तेच वाद
रंगविल्या चेहर्यावर पुन्हा तोच माज...
स्वतःचाही चेहरा आरशात पाहून घेईन म्हणतो
उद्या एक दिवस थोडा आराम करून घेईन म्हणतो...
अस्तित्वाच्या ओझ्याने जखडलेली मान
अन् आयुष्याच्या अंतराला दूरत्वाचे वाण
तुझ्या पदराआड थोडा निजून घेईन म्हणतो
उद्या एक दिवस थोडा आराम करून घेईन म्हणतो...
मध्यान्हिच्या ऊन्हात तळमळणारा प्राण
डोळ्यातून पाझरतेय जास्वंदाची तहान
अंगणात पुन्हा एक श्रावण शिंपून घेईन म्हणतो
उद्या एक दिवस थोडा आराम करून घेईन म्हणतो...
आयुष्यावर एक कविता करून घेईन म्हणतो...
व्याकुळल्या श्वासात आसमंत भरून घेईन म्हणतो...
पुन्हा एकदा थोडा जगून घेईन म्हणतो...
उद्या एक दिवस थोडा आराम करून घेईन म्हणतो...

wah wah khupah sundar... Ultimate
ReplyDeleteAnganat punha mazya shravan shimpun ghein mahnto!!!
ReplyDeletekay line ahe!!