Friday, June 26, 2009

एक वळण अजून...

बोलवणं आलं तेव्हा मी या शहराच्या गर्दीत कुठेतरी हरवून बसलो होतो पण...
ती संवेदनाच होती अंगावर शहारे आणणारी...
देहाचा प्रत्येक कण जणू पेटून उठला!!
स्वतःच्या शरीराची जाणीव प्रचंड प्रखरतेने करून देणारी एक शिरशिरी...
उतरत गेली.. मणक्यांतून...
आणि मी बेफाम निघालो..
वाटा चुकवत, नजरा टाळत...
प्रत्येक क्षणावर लादलेलं युगायुगांच ओझं पेलत
पण हाय रे दैवा....

आज प्रत्येक लाल दिवा माझ्याकडेच वटारून बघतो आहे...
प्रत्येक खळगा आज माझ्याच गाडी खाली येतोय...
प्रत्येक गाडी आज एक रिक्षा बनून चालते आहे...
आज मी वेगात आहे की जग संथ झालंय??

रस्त्याच्या प्रत्येक हिंदोळ्यासोबत शरीराच्या रोमारोमात उठणारी आंदोलनं
निग्रहानं परतवित मी संयमाची पराकाष्ठा करतो आहे...
डोक्यावर तरंगत्या या तलवारीचा हलकासा स्पर्शही आत्मसन्मानाची होळी करणारा...

मन आणि शरीर यांच्या या अविरत द्वंद्वात मी प्राणांतिक धावतो आहे...
माझ्या ध्येयाकडे...
मनाला सतत बजावित...
या निसरड्या वाटेवर फक्त एक... फक्त एक वळण अजून...

**************************************************
(कविता वाचून विचार आला ना मनात - की ही कविता अशी कशी? तर मग जरा कल्पना करा की कालच्या पार्टीत झालेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून पोटाने बंड केलंय, तुम्ही शहराच्या मधे गर्दीत बाइक वर आहात... आणि घरी पोचून सगळ्या "शंकांच" निरसन व्हायला किमान अर्धा तास तरी अजून आहे.
- स्वानुभवावर आधारित....)


Page copy protected against web site content infringement by Copyscape

Sunday, June 14, 2009

तू आणि मी...

दोनेक वर्षांपूर्वी "तू आणि मी" म्हणून एक फॉरवर्ड सुरु होते. त्यात "तू नगारा मी ढोल, तू उथळ मी खोल" असले बरेच काही होते. त्यावरूनच सुचलेल्या या ओळी.)

तू कडा, मी घाट
तू पाऊल, मी वाट

तू काल, मी आज
तू रूप, मी साज

तू भक्ति, मी ध्यास
तू प्रीती, मी आस

तू गंध, मी धुंद
तू सर, मी चिंब

तू कोकिळ, मी तान,
तू झरा, मी तहान


Page copy protected against web site content infringement by Copyscape